औरंगाबाद : गेल्या दोन महिन्यांपासून शहरात भीषण पाणीटंचाई जाणवत असून यातून मार्ग काढण्याकरिता उशिरा का होईना मनपा प्रशासनाच्या वतीने शहरातील ३४ विहिरींचे अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता. तहसील कार्यालयाच्या वतीने यापैकी २९विहरींचे अधिग्रहण करण्याकरिता हिरवी झेंडी मिळाली असल्याने आज सोमवार पासून नो नेटवर्क मधील नागरिकांना या विहीरीतून टॅंकरद्वारे पाणी पुरविण्यात येणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणातून शहरात येणारे पाणी 25 एमएलडी ने कमी झालेले आहे. तसेच जे पाणी शहरात येते त्याचेही नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर पाण्याची समस्या जाणवत आहे. यातून मार्ग काढण्याकरिता मनपा प्रशासनाने उन्हाळा संपत आल्यानंतर शहरातील ३४ विहीरींचे अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला होता. यात प्रभाग-१ मधून ३, प्रभाग-४ मधून १०, प्रभाग-८ मधून ११ आणि प्रभाग-९ मधून १० या विहीरींचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने हा प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे मंजूरीसाठी पाठवल्यानंतर अपर तहसीलदार रमेश मुनलोड यांनी तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकरवी विहीरींतील पाण्याची उपलब्धता, तपासणी केली. त्यातील ११ विहीरी सार्वजनिक तर १८ विहीरी खासगी असल्याचे निदर्शनास आले. या २९ विहीरींचे अधिग्रहण करण्याच्या प्रस्तावाला तहसीलदार मुनलोड यांच्यावतीने मंजुरी देण्यात आलेली असून आज पासून ज्या भागात जलवाहिनी नाही अशा नो नेटवर्क एरियात टँकरद्वारे या विहिरींचे पाणी पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना नागरिकांना दिलासा मिळणार आहे.